Markandeshwar Yatra मार्कंडेश्वर यात्रेची जय्यत तयारी - भाविकांसाठी अनेक सुविधा आणि भक्तीमय वातावरण !

Top Trending News    23-Feb-2025
Total Views |

markanda 
 
मोर्शी : विदर्भाची काशी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर यात्रेला (Markandeshwar Yatra) बुधवार (दि.26) पासून सुरुवात होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी मार्कंडेश्वर यात्रेसाठी (Markandeshwar Yatra) देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले आहे. यासाठी ट्रस्टच्या वतीने नियोजन केल्या गेले आहे. भाविकांची गैरसोय होऊ न देण्याची ग्वाही श्री मार्कंडेश्वर यात्रा (Markandeshwar Yatra) देवस्थान ट्रस्टच्या पदाधिका-यांनी दिली आहे.
 
महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या मार्कंडेश्वर यात्रेच्या (Markandeshwar Yatra) नियोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामू पाटील यांनी सांगितले की, सोमवारी (दि. 24) सकाळी 10.30 वाजता मुल येथील शिवचरण सारडा सपत्नीक व गडचिरोली येथील विश्राम होकम पत्नी वैभवी होकम यांच्या हस्ते वैनगंगा नदीत जलपुजन व गंगापूजन करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. 26) पहाटे 4.30 वाजता श्री शंकर महादेवाच्या व शिवलिंग पिंडीची विधिवत प्रारंभी महापूजा राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खा. डॉ. नामदेव किरसान, आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते होणार आहे. तर गुरव समाजाचे पंकज पांडे, शुभांगी पांडे हे सपत्निक पूजेचे यजमान राहणार आहे.
 
या दिवशी दर्शन रांगेमध्ये पहिला असलेल्या भाविकांचा शाल, श्रीफळ देऊन देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 27) सायंकाळी 6 वाजता टिपूर पूजन (दिवा लावणे) परंपरेनुसार व्याहाड येथील मारोती पाटील म्हशाखेत्री यांचे कुटुंबियांच्या हस्ते होईल. मार्कंडेश्वराची समारोपीय महापूजा माजी पं स. सदस्य तथा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार, पत्नी साधना गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात येईल. दुपारी 1 वाजता श्री मार्कंण्डेश्वरांची शोभायात्रा पालखी काढण्यात येईल. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद व उपवास खिचडीचे वितरण केले जाणार आहे.
 
यात्रेदरम्यान मंदिर परिसरात सोयीसुविधा
 
यात्रेदरम्यान मंदिरात व मंदिर परिसरात अस्थाही स्वरूपाची विद्युत व्यवस्था करणे, मंदिर परिसरात यात्रेचे वेळी दर्शनार्थी भाविकांना ऊन्ह-पावसापासून संरक्षणासाठी तात्पुरता कापडी मंडप उभारण्यात येणार आहे. भाविकांना रांगेतून दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेट (कठडे) उभारण्यात येणार आहे. दर्शनार्थी भाविकांना दिसेल अशा ठिकाणी गुप्तदान (हुंडी) बांधणे, महाप्रसाद तयार करण्यासाठी मंडप उभारणे, पाण्याची सुविधा, भाविकांना अल्प विश्रांतीसाठी तात्पुरते भक्त निवास व्यवस्था, महाप्रसाद वितरण मंडप व सूचना फलक ध्वनी शेप, तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय कापडी मंडप, दिव्यांग, गरोदर माता, स्तंनदा माता, जेष्ठ नागरिक व व्हीआयपी दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.
 
26 व 27 फेब्रुवारीला रात्री 12 पर्यंत मंदिर खुले
 
यात्रेदरम्यान 26 व 27 फेब्रुवारी अशे दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे. त्यानंतर भाविकांना सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार असल्याची माहिती मार्कण्डेश्र्वर देवस्थानचे वतीने देण्यात आली. दर्शनानंतर निःशुल्क महाप्रसाद व पाण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती माहिती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
 
मार्कंडा यात्रेकरीता 74 बसेसचे नियोजन
 
यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता ब्रह्मपुरी, अहेरी व गडचिरोली परिवहन महामंडळ विभागाच्या वतीने 24 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत 74 एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 पर्यंत गडचिरोली परिवहन महामंडळ विभागाच्या वतीने गडचिरोली वरून चामोर्शी-मार्कंडादेव करिता 15 बस, चामोर्शी ते मार्कंडा 15 बस, सावली ते साखरी घाट 1 बस, व्याहाड खुर्द ते साखरी घाट 1 बस, व्याहाड (बुज.) ते साखरी घाट 1 अशा 33 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तर ब्रह्मपुरी आगारातून मुल मार्गे मार्कंडाकरिता 20 बसेस सोडण्यात येणार आहेत. तर अहेरी आगारातून आष्टी-मार्कंडा-चपराळा करिता 10 बस, ब्रह्मपुरी, गडचिरोली, अहेरी आगाराच्या 63 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ब्रह्मपुरी आगारातून ब्रह्मपुरी ते अरततोंडी यात्रेसाठी 2, अहेरी आगारातून आष्टी - चपराळा 5, अहेरी ते व्यंकटापुर 2 व अहेरी ते कालेश्वर 2 अशा 11 अशा एकूण 74 बसेसचे नियोजन केले आहे.
 
यात्रेकरीता मुल यात्रा केंद्रावर 25 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत ब्रह्मपुरी आगार व्यवस्थापक व वाहतूक निरीक्षक राजू पांडव, लेखाकार किशोर वानखेडे व वाहतूक नियंत्रक आश्विल जगंकर, लिपिक वैभव बद्दलवार, शिपाई रवींद्र पुंनगटवार तर सावली यात्रा केंद्रावर वाहतूक नियंत्रक यात्रा प्रमुख अशोक नैताम, आष्टी केंद्रावर वाहतूक नियंत्रक म्हणून लेखाकार एफ. के. निमसरकार, वाहतूक निरीक्षक कल्पना सोनवणे, कार्तिक बत्तुलवार, लिपिक नरेंद्र दुमनवार हे असणार आहेत. चपराळा यात्रा केंद्रावर अहेरी अगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक जितेंद्र वैद्य, सुरेंद्र कावळे, पंकज वरगंटीवार तर चामोर्शी केंद्रावर वाहतूक निरीक्षक सुरेश कोवे, विनोद काळे व वरिष्ठ लिपिक सुनील पिपरे, दीपक रोडगे तर गडचिरोली केंद्रावर आगार व्यवस्थापक हे केंद्राचे प्रमुख राहतील. त्यांच्या मदतीला वाहतूक निरीक्षक सोनी लीचडे व वाहतूक नियंत्रक अशोक सुत्रपवार, नीतेश मडावी तर चामोर्शी रोडवरील बसथांब्यावर गडचिरोली वरिष्ठ लिपिक अमित ठाकूर, निशिकांत उईके, डेनी ढवळे, किशोर वासनिक हे यात्रा संपेपर्यंत केंद्रावर नियंत्रण ठेवणार आहेत. विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे हे संपूर्ण यात्रेचे प्रमुख राहणार आहेत.
 
भाविकांनी बसेसचा लाभ घ्यावा - वाडीभस्मे
 
मार्कंडा यात्रेकरिता ये-जा करणाऱ्या भाविक प्रवाशांनी एसटी बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली राप विभाग नियंत्रक वाडीभस्मे यांनी केले आहे.