दिल्ली : जसा जसा आर्थिक विकास होत आहे, तसा कौटुंबिक आणि सामाजिक रचनेत अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. बऱ्याच प्रगत राष्ट्रात आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्येही हे बदल प्रकर्षाने दिसू लागलेले आहेत. यातच मॉर्गन स्टॅनली या संस्थेचा एक अहवाल समोर आला आहे. यानुसार, जगभरातील महिला पारंपरिक कौटुंबिक जबाबदाऱ्यांपेक्षा करिअरला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे २०३० पर्यंत ४५ टक्के महिला एकट्या आणि मुलंबाळाशिवाय राहतील, असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. २५ ते ४४ वयोगटातील महिलांबद्दलचा हा अहवाल आहे. महिलांनी विवाह करणे टाळत आहेत किंवा एकटे राहणे पसंत करत आहेत. पूर्वी विशीतच लग्न करण्याची प्रथा होती. मात्र आता महिला वैयक्तिक विकास आणि करिअरकडे लक्ष देऊ लागल्या आहेत, त्यामुळे एकटे असणे जास्त ‘Attractive Status’ असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
आत्म प्रेमाची संकल्पना महत्वाची
आज महिलांची स्वतःप्रती जागृती वाढली आहे. त्यामुळे, त्या आता स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नरत असतात. पूर्वी सुद्धा स्त्रिया काम करायच्या परंतु, काम करून घर सांभाळणं याकडे त्यांचा जास्त कल असायचा. परंतु आता स्वतःचा आनंद शोधन खूपच आवश्यक झालं आहे. आजकाल, सर्वच गोष्टींचा वेग वाढला आहे तसाच येणाऱ्या ताणाचाही वेग वाढला आहे. त्यामुळे जर आपण आनंदी आणि समाधानी राहू तरच आपण इतरांना आनंदी ठेऊ शकू, यावर विचार करणे फारच गरजेचं ठरत आहे.
मातृत्व टाळण्याकडे कल का ?
पूर्वी मुलीचं अगदी कमी वयात लग्न व्हायच तसेच मुलंही लवकर होत असत. पण, हल्ली महिला लवकर मातृत्वाचा विचार करत नाहीत. वर्क लाईफ बॅलन्स, करिअरमधील विकास, मुलांचा खर्च अशी बरीच कारणे असल्याचे जाणवते. आता बऱ्याच कुटुंबात महिला या कमावत्या आणि कुटुंबाच्या प्रमुख आर्थिक आधारस्तंभ बनत आहेत. महिला आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी बनल्या आहेत. त्याचबरोबर त्या आता वैयक्तिक आनंद आणि करिअरमधील विकासाकडेही जास्त लक्ष देत आहेत.
अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल ?
एकट्या आणि मुलांशिवाय राहणाऱ्या महिलांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, असे सांगितले जात आहे. अधिकाअधिक महिला लग्न टाळू लागल्या किंवा लग्न उशिरा करू लागल्या किंवा अधिकाधिक महिलांनी मूले होणे टाळले तर महिलांचा आर्थिक प्रभाव जास्त वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे.
२०३० मध्ये समाजातील लग्न, पालकत्व याकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनात फारच बदल घडणार असल्याचे हा अहवाल सांगतो आहे. मुलांचा सांभाळ होण्याच्या दृष्टीने अधिक प्रागतिक धोरणे आखली जातील, कामाच्या वेळा लवचिक होतील, वेतनात समानता येईल, असे तज्ज्ञांना वाटते. जागतिक अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची बनत जाईल. कामाच्या ठिकाणी आणि बाहेरही महिलांचे वाढते महत्त्व आणि महिलांचे स्वातंत्र्य हा या मागचा कळीचा मुद्दा ठरणार आहे.