सामाजिक न्यायाचा ध्वज फडणवीसांकडे, ईव्हीएम टीकेला बावनकुळे यांचे सडेतोड उत्तर

17 Dec 2024 17:08:03

                                     political
 
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून काम करणारे नेते असल्यानेच मंत्रिमंडळात सर्व समाजघटकांना त्यांनी सामावून घेतले आहे. एससी, एसटी, ओबीसी, महिला अशा सर्व घटकांना प्रतिनिधित्व देवून त्यांनी सामाजिक व प्रादेशिक समतोल योग्य साधला आहे, असे मंत्री व भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे (Chnadrashekhar Bawankule) म्हणाले.
 
राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधकांना पराभवाचे योग्य आकलन झालेले नाही. पराभवाचे व्यवस्थित आकलन न करता ते ईव्हीएमवर खापर फोडत बसले तर, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत त्यांची याहून बिकट स्थिती होईल. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते ईव्हीएमवर शंका उपस्थित करून मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान करत आहेत, असे त्यांनी सांगितले. 
 
* विदर्भाच्या प्रश्नांना न्याय
 
नागपूर करारानुसार हे अधिवेशन होते. यामध्ये विदर्भातील शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांना न्याय देणे, विदर्भातील प्रश्न सोडवणे अपेक्षित असते. विदर्भाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे अधिवेशन असते. हे सरकार विदर्भातील जनतेला, इथल्या प्रश्नांना पूर्ण न्याय देईल.
 
* परभणी येथील घटना दुर्दैवी
 
भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद अशी रचना असते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल आमचे केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेईल. खातेवाटपावरून महायुतीमध्ये कोणतेही वाद नाहीत. परभणी येथील घटना दुर्दैवी असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कारवाई केली असून, ते विधिमंडळात याबाबत सविस्तर उत्तर देतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महायुतीतील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे आम्हाला कायम मार्गदर्शन लाभते. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा सन्मान राखून त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेतील, असे बावनकुळे म्हणाले.
Powered By Sangraha 9.0