नागपूर : नागपूर शहरातील पाचपावली परिसरात एका बांधकामाधीन इमारतीत गुप्तरित्या मेफेड्रोनचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय युनिटला मिळाली होती. या विशिष्ट माहितीच्या आधारे १० ऑगस्ट २०२४ रोजी एक सुसंघटित शोध मोहीम राबविण्यात आली.
मेफेड्रोनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज एक छोटी प्रयोगशाळा या इमारतीत उभारण्यात आल्याचे या शोध मोहिमेत आढळून आले. या कटाच्या म्होरक्याने प्रथम यंत्रसामग्रीचा संपूर्ण संच खरेदी केला आणि प्रयोगशाळा उभारली तसेच १०० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा माल देखील जमा केला.
या टोळीने आधीच द्रव स्वरूपातील ५० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले होते आणि क्रिस्टलाइज्ड अथवा पावडर स्वरूपातील उत्पादन तयार करण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होती. सुमारे ७८ कोटी रुपये किमतीचे ५१.९५ किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले असून यासोबत कच्चा माल आणि उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत. अमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत मेफेड्रोन हा मनावर नकारात्मक परिणाम करणारा पदार्थ आहे.
या टोळीचा म्होरक्या किंवा भांडवलदार आणि मेफेड्रोन उत्पादनात गुंतलेल्या त्याच्या तीन साथीदारांना अमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चमूला नागपूर पोलिसांचेही सहकार्य मिळाले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी जटिल मोहीम हाती घेण्याच्या आणि त्या यशस्वी करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या क्षमतेला ही मोहीम आणखी बळकटी प्रदान करते.