दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा (Australia) अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) बॉर्डर - गावस्कर करंडक स्पर्धेपूर्वी जसप्रीत बुमराहचे (jasprit Bumrah) कौतुक केले आणि त्याला सर्व फॉरमॅटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून वर्णन केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताने (India) ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत.
जर भारताने सलग तिसरी कसोटी मालिका जिंकायची असेल तर बुमराहच्या ऑस्ट्रेलियातील (Australia) असामान्य कौशल्यावर बरेच काही अवलंबून असेल. स्मिथने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, "तो एक महान गोलंदाज आहे. मग, त्याचा सामना नवीन चेंडूसोबत असो की जुना चेंडू असो. त्याच्याकडे सर्व प्रकारची उत्तम कौशल्ये आहेत. तो एक उत्तम गोलंदाज आहे. तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे.
गेल्या काही मालिकांमध्ये पस्तीस वर्षीय स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी (Australia) डावाची सुरुवात केली असून भारताविरुद्धही त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियाकडून (Australia) १०९ कसोटी सामने खेळलेला स्मिथ या बहुप्रतिक्षित मालिकेदरम्यान १०,००० कसोटी धावांचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. त्याने आतापर्यंत ९६८५ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, बुमराहने जानेवारी २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ३७ सामन्यात २०.५१ च्या सरासरीने १६४ बळी घेतले आहेत.