नागपूर - दक्षिण मध्य रेल्वेच्या आयजी अरोमा सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे संरक्षण दलाने महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी ऑपरेशन मेरी सहेली (Operation Meri Saheli) ही विशाल मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन मेरी सहेली (Operation Meri Saheli) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू करण्यात आल्या असून, रेल्वेने प्रवास करणा-या आणि रेल्वे परिसरातील सर्व महिलांना सुरक्षा देण्याच्या उद्देशाने विभागातील महिला सुरक्षा कर्मचा-यांवर महत्त्वाच्या जबाबदा-या सोपवण्यात येत आहेत.
ऑपरेशन मेरी सहेली
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफकडून ऑपरेशन मेरी सहेली (Operation Meri Saheli) ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 230 महिला संघ दररोज 3 हजार 240 ट्रेनमधून प्रवास करणा-या महिलांशी संपर्क साधतात. त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा या साठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यामुळे महिला प्रवाशांचा मानसिक ताणही कमी होतो.
'शक्ती' आणि 'दुर्गा वाहिनी' पथके
महिला सुरक्षाकर्मींनी तयार केलेली 'शक्ती टीम' (shakti team) आणि 'दुर्गा वाहिनी' (Durga Vahini) पथके रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहेत. या पथकांचे उद्दिष्ट फक्त गुन्हेगारी रोखणे नाही तर महिलांना सुरक्षिततेचा आणि आत्मविश्वासाचा अनुभव देणे आहे.
मानव तस्करी विरोधातही ऑपरेशन
आरपीएफने 'ऑपरेशन आहत' (Operation Ahat) अंतर्गत मानव तस्करीविरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. 2023 मध्ये या मोहिमेद्वारे 3 हजार 973 मुलींना तस्करीच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आले.
सक्षमीकरणाच्या दिशेने पावले
आरपीएफमध्ये 9 टक्के महिला सुरक्षा कर्मचारी आहेत. यावरून त्यांचा विभागावरील विश्वास दिसून येतो. 47 आरपीएफ पोलिस ठाण्यात महिला वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि महिला निरीक्षक कार्यरत आहेत. यासोबतच महिला कर्मचा-यांसाठी विशेष बॅरेक, चेंजिंग रूम आणि प्रसूती व बाल संगोपन रजा या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. इतकेच नव्हे तर भविष्यात सुरक्षितता वाढवण्यासाठी एआय यंत्रणा, लाइव्ह ट्रॅकिंग आणि मोबाइल सुरक्षा ॲप्स यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहेत.