भुवनेश्वर - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा (Principal Secretary P. K. Mishra) यांची मुलगी आणि जावई असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या जोडप्याला ओडिशात अटक करण्यात आली आहे. हंसिता अभिलाषा (38) आणि अनिलकुमार मोहंती अशी या जोडगोळीची नावे आहेत. हंसिता ही कंधमाल जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर मोहंती हा लहान व्यापारी आहे.
सत्ताकारणातील बड्या लोकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संबंध असल्याचा दावा करून या दोघांनी अनेकांना गंडविल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पी. के. मिश्रा (Principal Secretary P. K. Mishra) यांची मुलगी आणि जावई असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोहंती हा अभिलाषाचा पती असल्याचे समजते. एका खाणमालकाच्या तक्रारीवरून या दोघांवर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अटक करण्यात आली, अशी माहिती भुवनेश्वरच्या झोन 6 चे अतिरिक्त पोलिस उपायुक्त स्वराज देबटा यांनी दिली.
बड्या लोकांच्या मॉर्फ फोटोवरून फसवणूक
पोलिसांनी त्यांच्या घरातून काही छायाचित्रे जप्त केली आहेत. यात मुख्य सचिवांसह अन्य प्रसिद्ध लोकांसोबतचे त्यांचे फोटोही आहेत. भुवनेश्वरमधील श्रीमंत व्यापारी, बिल्डर, खाण संचालक व इतर श्रीमंत लोकांची या दोघांनी फसवणूक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा (Principal Secretary P. K. Mishra) या सारख्या प्रभावशाली लोकांच्या छायाचित्रांशी छेडछाड करून सावज जाळ्यात गाठण्यासाठी त्याचा वापर केला. मोठमोठ्या निविदा मंजूर करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन या दोघांनी पीडितांना दिले होते.