Ajit Pawar vs Eknath Shinde एकनाथ शिंदेंवर अजित पवार संतापले ! कडक शब्दात म्हणाले "असले धंदे करा बंद"

02 Mar 2025 19:12:48

vs 
पुणे - (Ajit Pawar vs Eknath Shinde) पुण्यात शिवसेनेचा भगवा फडकवायचाय, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पुणे दौऱ्यात केली. याबद्दल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केले. लावालाव्या करायचे धंदे बंद करा, असे म्हणत अजित पवार काहीसे संतापल्याचे पाहायला मिळाले.

 
पुण्यासह राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींवर अजित पवारांनी भाष्य केले त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे दौऱ्यात केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पुणे भगवे करायचंय. पुण्यात भगवा फडकवायचाय, असं शिंदे म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार काहीसे भडकले. 'तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा, हे असले धंदे बंद करा. खऱ्या बातम्या द्यायला शिका,' असा सल्ला त्यांनी दिला.
 
आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. आम्हाला राज्यातील जनतेनं मोठं बहुमत दिलं आहे. पण त्याच बरोबर प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यामुळे ते जातील तिथे तसे म्हणणार. भगवा करायचा म्हणाले ना ? पुणे जिल्हा भगवा करायचा असंच म्हणाले ना ? ते महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर तसं सांगू शकतात. त्यात वावगं काहीच नाही,' असं अजित पवार म्हणाले.
Powered By Sangraha 9.0