नागपूर : ( Viral Police Assault Video ) दुचाकीस्वार पोलिसाला हेल्मेट घालण्यास सांगणे एका तरुणाला चांगलेच भोवले. यामुळे चिडलेल्या पोलिसाने त्या तरुणाला शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Police Assault Video ) होत होता. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पीडित तरुणाने पोलिसाविरुद्ध जरीपटका ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानंतर आरोपी पोलिसावर वाहन चालवताना हेल्मेट न घालण्यासाठी दंडात्मक कारवाई ( Viral Police Assault Video ) करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेवरून सामान्य नागरिकांवर हेल्मेटची सक्ती करणारे पोलिसच नियमाचे पालन करीत नसल्याची बाब समोर आली आहे.
जरीपटका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रतिक खणकुरे हा युवक बुधवारी दुपारी जरीपटका मार्गाने जात होता. मानकापूर पुलाजवळून जात असताना आनंद सिंग नावाचा पोलिस कर्मचारी हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना त्याला दिसला. त्यामुळे प्रतिकने ‘साहेब हेल्मेट घाला’ असा सल्ला त्या पोलिसाला दिला. त्यामुळे चिडलेल्या आनंद सिंग यांनी प्रतिकला जवळ बोलावून त्याच्या कानशिलात लगावली. तसेच त्याच्याशी अरेरावी करीत ‘जा नाही घालत हेल्मेट, तुला जे करायचे ते करून घे’ अशी धमकी दिली. तसेच दातांचा उपचार करून आल्यामुळे हेल्मेट न घातल्याची सबब दिली. या प्रकरणी प्रतिकने जरीपटका पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानंतर वाहतूक शाखेने आनंद सिंगवर हेल्मेट न घातल्यामुळे दंडात्मक कारवाई केल्याची माहिती आहे.