Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या वक्तव्याने खळबळ ! प्रतापसिंह महाराजांनीच सुरू केली पहिली मुलींची शाळा

Top Trending News    12-Apr-2025
Total Views |

uaday
 
पुणे : ( Udayanraje Bhosale ) स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टिकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम कोणी पाऊल उचलले असेल, तर ते थोरले प्रतापसिंह महाराज होते, असा दावा भाजपा खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी शुक्रवारी केला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 
खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात फुलेवाडा येथे जात अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थोरले प्रतापसिंह महाराजांनी सातारा येथील राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती, असे म्हटले. विशेष म्हणजे याच राजवाड्यात देशाचे संविधान निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील प्राथमिक शिक्षण झाले, असे दावाही त्यांनी केला.
 
उदयनराजे ( Udayanraje Bhosale ) पुढे म्हणाले की, महात्मा फुले हे दूरदर्शी नेतृत्व होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून सर्व समाज सुधारण्याचे कामाकरिता आयुष्य खर्ची केले. जे युगपुरुष होऊन गेले त्यांचे स्मारक जतन करणे आपले र्कतव्य आहे. त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळून सदर विचारांचे त्यांनी पालन करून ते आचरणात आणावे.
 
काँग्रेसकडून इतिहासाच्या मोडतोडीचा आरोप
 
मुलींची पहिली शाळा फुले दाम्पत्य यांनी सुरू केली नाही, असे उदयनराजे ( Udayanraje Bhosale ) यांनी सांगणे दुर्देवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सावित्रीबाई फुले यांनी प्रथम मुलींची आणि अस्पृश्य यांच्यासाठी शाळा सुरू केली, पण खरा इतिहास मोडतोड केला जात आहे. महात्मा फुले वाड्यामध्ये जाऊन त्यांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उदयनराजे यांना अभ्यास करून बोलण्याचा सल्ला दिला आहे.