नाशिक: ( Arvind Sawant On Amit Shah ) ‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडावर गेलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी रायगडावरची माती डोक्याला लावून आपला नेमका शत्रू कोण आहे, हे ओळखावे आणि सत्य बोलण्याची शपथ घ्यावी’, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सांवत ( Arvind Sawant On Amit Shah ) यांनी लगावला. शाहा यांनी देशात अनेक शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला सोबत घेतले, याचा अर्थ समजून रायगडावरून चौफेर नजर टाकून महाराष्ट्र ओळखावा असा सल्लाही सांवत यांनी दिला आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री शाहा यांच्या दौऱ्यावर टीका केली.
देशात कायदा सुव्यवस्था राखली जावी, असे वाटत असेल त्यांनी स्वतःहून चर्चा निर्माण केली पाहिजे. जे गुन्हेगार नाहीत त्यांना शिवाजी महाराज शासन देत नव्हते. परंतु, येथे पळवाटा काढल्या जातात. सीबीआय, ईडीच्या माध्यमातून विरोधकांवर कारवाई केली जाते. स्वराज्य मिळाल्यावर सगळ्यांना सोबत घेऊन जावे लागते. परंतु, ‘सबका साथ सबका विकास’ असा डॉयलॉग मारणे सोप्पे असते, अशी टीका त्यांनी भाजपा आणि शाहा यांच्यावर केली.