नागपूर : ( Shyam Hotel Memorial ) पवित्र दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर, 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीची बुध्द धम्मदीक्षा लाखो अनुयायांना दिली. बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभला तो सीताबर्डी आनंदनगरातील श्याम हॉटेलला ( Shyam Hotel Memorial ). हे हॉटेल त्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होते. तब्बल आठ दिवसांच्या क्रांतीचे हे हॉटेल केंद्रबिंदू ठरले होते. खोली क्र.116 मध्ये बाबासाहेबांचा मुक्काम होता. सोमवार, 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुन्हा या आठवणींना उजाळा मिळाला. आता या ठिकाणी 4 माळयांचे स्मृती विहार प्रस्तावित आहे. त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून मनपाने ठरावही केला. परंतु, अद्यापही हे काम सुरूच झाले नाही. यासाठी 77 कोटी प्रस्तावित आहे. पवित्र दीक्षाभूमीवर ऐतिहासिक अशी धम्मदीक्षा सोहळा झाला. यासाठी बाबासाहेब आठवडाभर नागपूर व चंद्रपूर येथील धम्मदीक्षेच्या सोहळयासाठी श्याम हॉटेलमध्ये ( Shyam Hotel Memorial ) मुक्कामाला होते.
14 ऑक्टोबरला प्रत्येक अनुयायी दीक्षाभूमीवर जाण्यापूर्वी बाबासाहेब थांबलेल्या या हॉटेलचे ( Shyam Hotel Memorial ) दर्शन घेऊनच पुढे जात होते. अनेक साक्षीदार आवर्जून ही बाब आजही सांगतात. त्यामुळेच आंबेडकरी जनतेने या हॉटेलला राष्ट्रीय स्मारक करावे, अशी मागणी केली. 2012 मध्ये यासाठी लढा सुरू केला. त्यानंतर महापालिकेने 30 एप्रिल, 2012 मध्ये श्याम हॉटेल ( Shyam Hotel Memorial ) राष्ट्रीय स्मारकाचा ठराव पारित करण्यात आला. या ठरावास आज 13 वर्षे झाली. मात्र, आहे तेथेच आहे. हा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात सादर झाला. सध्या तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराधीन आहे. यामुळे ही घोषणा लवकर व्हावी, या प्रतीक्षेत आंबेडकरी समाज आहे.
बाबासाहेबांनी घेतली होती पत्रपरिषद
11 ऑक्टोबर 1956 रोजी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी बाबासाहेब, माईसाहेब (डॉ. सरिता आंबेडकर) व नानकचंद रत्तू यांचे अॅम्बेसेडर गाडीतून श्याम हॉटेलमध्ये ( Shyam Hotel Memorial ) आगमन झाले. बाबासाहेब 116 क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. 13 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता याच हॉटेलमध्ये बाबासाहेबांनी पत्रपरिषद घेतली होती. धम्मदीक्षेनंतर तरुण भारतचे संपादक ग. त्र्यं. माडखोलकर श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेबांना भेटायला आले होते. माडखोलकरांनी बाबासाहेबांना नागपुरातील धम्मदीक्षा अर्थात बौद्ध पंथाला 'भीमयान' म्हणायला काय हरकत आहे असे विचारले होते, ‘बाबासाहेबांनी हसून उत्तर दिले होते, 'तुम्हाला वाटल्यास तुम्ही म्हणा, पण मी म्हणणार नाही. मी स्वतःला भगवान बुध्दाइतका मोठा समजत नाही. मी एक लहान माणूस आहे. मी जगाला काही नवीन विचार दिला नाही. मी एवढेच समजतो की, बुद्धाचे धम्मचक्र गेली कित्येक हजार वर्षे स्थगित होऊन गेलेले होते, ते पुन्हा प्रवर्तित करण्याचे भाग्य मला लाभले.
लीज रद्द करा, जागेचा ताबा घ्या...
श्याम हॉटेलची जागा आणि इमारतीचा ताबा भारतीय पुरातत्त्व कार्यालयाकडे देण्यात येणार होता. याबाबत कार्यवाहीचे अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात येईल असे जाहीर केले होते. या स्मारकासाठी प्रस्तावित 7 हजार 500 चौरस फूट जागा आहे. सध्या ही जागा आस्वाद रेस्टॉरंट प्रा. लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद लक्ष्मीनारायण जयस्वाल यांना लीजवर देण्यात आली आहे. ही जागा एप्रिल 2004 मध्ये 30 वर्षांच्या लीजवर जयस्वाल यांच्या ताब्यात आहे. राज्य शासनाने या इमारतीस राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून हिरवी झेंडी दाखविल्यास लीज रद्द करण्याची तसेच नियमानुसार मोबदलाही देण्याचीही महापालिकेची तयारी होती. आता मनपाने उत्साह दाखविला नाही. यामुळे तत्काळ जागेचा ताबा घ्यावा आणि स्मृती विहाराची घोषणा करावी, अशी मागणी डॉ. भीमराव गोटे, ॲड. हंसदास भांगे यांनी केली आहे.
असा आहे सामाजिक न्याय विभागाचा आराखडा
-बाबासाहेबांनी मुक्काम केली ती खोली क्र.116 सुसज्ज करणार
-बाबासाहेबांचा 56 फूट उंच पुतळा उभारणार
-बहुद्देशीय सभागृह उभारण्याचे प्रस्तावित
-कलादालन
-ध्यानसाधना सभागृह
-इ-लायब्ररी
-लाइट ॲण्ड साऊंड शो