नागपूर : ( Thombre Bai In London ) शंभर टक्के शुद्ध व-हाडी ही ओळख अभिमानाने मिरवणारी आणि आपल्या ठसकेबाज शैलीत विनोदाची उधळण करणारी नेहा ठोंबरे बाई ( Thombre Bai In London ) आता थेट लंडनच्या रंगमंचावर हशा पिकवणार आहे. वैदर्भीय मातीतील बोलीतील तिचा खास स्टँडअप कॉमेडी शो मिडलसेक्स येथील सेंट लॉरेन्स चर्चच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. लंडनहून आलेले हे निमंत्रण म्हणजे विदर्भाच्या हास्यकलेला मिळालेला एक मोठा आंतरराष्ट्रीय सन्मानच मानला जात आहे. लंडनमधील हा कार्यक्रम केवळ एक शो नव्हे तर मराठी भाषेच्या, विशेषतः विदर्भातील बोलीच्या जागतिक व्यासपीठावर झालेल्या यशाचे प्रतीक ठरणार आहे. या निमित्ताने मराठी मातीचा सुगंध थेट महाराष्ट्रातून लंडनपर्यंत पोहोचणार आहे, याचा चाहत्यांना अभिमान वाटतोय.
नेहाच्या ‘ठोंबरेबाई’ या व्यक्तिरेखेने तिला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिच्या विनोदी सादरीकरणात स्थानिक भाषा, गावाकडचा गहिवर आणि स्त्री जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण यामुळे ती प्रेक्षकांच्या अधिक जवळ पोहोचते. तिच्या सादरीकरणात विनोदासोबतच वास्तवाचे हलकेफुलके चित्रण असते, जे लोकांच्या हृदयाला भिडते. ठोंबरे बाईंच्या कुटुंबीयांनीही या यशाचा आनंद व्यक्त केला. तिच्या या टप्प्यावर पोहोचण्यामागे सातत्य, मेहनत आणि लोकांच्या प्रेमाचे श्रेय दिले आहे.